काय आहे, बोन्साय!
‘बोन्साय’, म्हणजे मोठ्या झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती!
‘बोन’ म्हणजे छोटी कुंडी किंवा भांडे आणि ‘साय’ म्हणजे झाड. छोट्या कुंडीत असलेले झाड म्हणजे बोन्साय! मुळात भारतीय असलेली, ही कला बोद्ध भिक्षुंबरोबर जपानमध्ये गेली आणि ती जपानमध्ये कला म्हणून बहराला आली.
ज्या झाडांना अनेक फांद्या असतात आणि जी झाडे पसरट असतात, अशा झाडांचे बोन्साय होऊ शकते. जगामध्ये वातावरणाचे एकूण १६ प्रकार असून, भारतामध्ये त्यांपैकी १२ प्रकार आहेत. एकच देशामध्ये एकाचवेळी इतके प्रकार अस्तित्त्वात असणे, ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. त्यामुळे भारतामध्ये सुमारे १५ हजार प्रकारची झाडे बोन्साय होऊ शकतात.
बोन्सायच्या आकारानुसार त्याचे प्रकार आहेत. अगदी आपल्या बोटावर मावणारे म्हणजे, ‘मामे’ बोन्साय. तळहातावर मावू शकेल, या आकाराचे बोन्साय, म्हणजे ‘शोहीन’. त्यापेक्षा थोडे मोठे म्हणजे (स्मॉल) छोटे बोन्साय. त्यानंतर मध्यम (मिडीयम) बोन्साय, मग मोठे (लार्ज) बोन्साय आणि १ मीटर पेक्षा जास्त मोठे असणारे अति (एक्स्ट्रा लार्ज) मोठे बोन्साय.
‘बोन्साय’, हे शास्त्र आहे आणि कलाही! जीवशास्त्राच्या, फलोत्पादन शास्त्राच्या नियमानुसार, बोन्सायची झाडे वाढतात. पण झाड कसे असावे, हे बोन्साय करणारा कलाकार ठरवतो. आणि त्याच्या मनात असलेला आकार, तो बोन्सायला देतो.
वादाचे डेरेदार झाड, समुद्रातील डोंगरावर उगवलेली झाडे, पडक्या वाड्यात भिंतींवर वाढलेली झाडे, असे आकार मनात ठरवून कलाकार बोन्साय तयार करू शकतात. पाहणाऱ्याला, हे आकार अगदी हुबेहूब वाटतात.
या झाडांना नेहमीच्या झाडांसारखीच फुले येतात. फळे येतात. ही फळे आपण नेहमीच्या फळांसारखी खाऊ शकतो.
‘बोन्साय नमस्ते’तर्फे २२ ते २५ फेब्रुवारी २०१८ दरम्यान भारतामधले बोन्सायचे आजवरचे सर्वात मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये एक हजारपेक्षा जास्त बोन्साय पाहायला मिळणार आहेत. फुले, फळे असणारी अनेक प्रकारची बोन्साय, या प्रदर्शनामध्ये पहायला मिळणार आहेत.
बोन्साय तज्ज्ञ आणि कलाकार प्राजक्ता काळे यांनी ३५ वर्षांच्या प्रयत्नातून, साकारलेली ही बोन्साय, या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील.
Leave A Comment